आय-खेती ची वैज्ञानिक शेती
विज्ञान ,तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची सांगड घालत पर्यावरणीय संवेदनशीलता केंद्रस्थानी असलेला ‘आय -खेती’ हा अर्बन फार्मिंगचा बिझनेस करणाऱ्या उद्योजिका प्रियांका अमर शाह वर महाराष्ट्र टाइम्स मध्ये फीचर ! अर्थातच प्रियांका WeSchool ची माजी विद्यार्थिनी आणि ‘आय-खेती’ची स्थापना आपल्या इनोवी लॅबमध्ये झाली असल्याने आम्हाला तिचा अभिमान आहेच पण राष्टीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्स ने तिच्या कार्याची दाखल घेतली हे विशेष !!
सध्या ‘ऑरगॅनिक फूडस्’ खाण्याकडे सगळ्या ‘हेल्थ-कॉन्शस’ मंडळींचा वाढता ओढा आहे; परंतु घरच्या घरी सेंद्रिय /ऑर्गॅनिक शेतीद्वारे आपण हे अन्न मिळवू शकतो हा विचार आपण करतो का ? शहरातल्या आपल्या छोट्याश्या घरात बाग बनवावी,त्यातून रोजच्या वापरातल्या भाज्या,हर्ब्स ,गवती चहा -तुळशीसारख्या औषधी वनस्पती उपलब्ध व्हाव्यात असे अनेकांचे स्वप्न असते;परंतु त्यासाठी काय करायला हवे हे आपल्याला कळत नाही. महानगरातल्या अगणित सोसायट्यांमध्ये छोट्या फ्लॅट्समध्ये राहणाऱ्याची आस आणि गरज ओळखून ‘आय-खेती’ (i -Kheti) गेले पाच वर्ष वैज्ञानिक पद्धतीने शेती करायला शहरी लोकांना प्रशिक्षित करतेय..
माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (WeSchool )) मधून एमबीए इन बिझनेस डिझाईन ही पदविका घेताना शेतीकडे वळण्याचा विचारही कोणी केला नसता.परंतु लहानपणापासूनच निसर्गाची आवड असलेल्या प्रियांका शाहने मात्र ऑर्गॅनिक आणि अर्बन फार्मिंगमध्ये आपला बिझनेस सुरु करायचा निर्णय घेतला आणि त्यातूनच वेलिंगकरच्या ‘इनोवि ‘या इनोव्हेशनसाठी प्रोत्साहन देऊन,त्यातून तरुणाईच्या उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये ‘आय-खेती’ ची स्थापना झाली. मुळात निसर्गाची आवड केंद्रस्थानी असलेल्या बिझनेसमध्ये उडी घ्यायची त्यातून नागरी समाजाच्या गरज भागवताना पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबतची जागरूकताही जपायची हा विचार या मागे होता .डिझाईन थिंकिंग विचारसरणीचा पुरस्कार करत ,त्यातून नवसंशोधन ,नवनिर्मितीला चालना देत एमबीए करणाऱ्या तरुण पिढीला उद्योजकतेकडे वळवणाऱ्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट (WeSchool )मध्ये ही कल्पना रुजली नसती तर नवलच .
“WeSchool चे समूह संचालक डॉ उदय साळुंखे आणि एक्स्पर्ट फॅकल्टीनी ही कल्पना उचलून धरली आणि तिचे बिझनेसमध्ये रूपांतर करण्यात सर्वतोपरी सहकार्य दिले .त्याच्यामुळे ‘पिच ‘सारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या तरुण उद्योजकांच्या स्पर्धेत मी सामील होऊ शकले .तो माझ्या बिझनेसकडे वळण्याच्या वाटचालीतला महत्वाचा आणि निर्णायक टप्पा ठरला ” प्रियांका वेलिंगकर इन्स्टिट्यूट (WeSchool )ने दिलेल्या पाठबळाविषयी नमूद करताना म्हणते.
घरगुती बागेची आवड जोपासण्यापासून ते शास्त्रशुद्ध ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी आय-खेती((i -Kheti) प्रयत्नशील आहे. वैज्ञनिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान वापरलं तर शहरातील छोट्या जागेतसुद्धा शेती करत येते या कल्पनेतून ‘आयखेती’(i -Kheti) चा प्रवास सुरु झाला. एरोबिक कंपोस्टिंग , हायड्रोपोनिक्स ,व्हर्टिकल फार्मिंग यासारख्या शेतीतल्या आधुनिक वैज्ञानिक पद्धती वापरून आयखेतीमध्ये ऑरगॅनिक फार्मिंग केले जाते. मुंबईतल्या अनेक कॉर्पोरेट्स ,शाळा विशेषतः म्युन्सिपाल स्कूल्स आणि रहिवासी निवासांमध्ये हया शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यासाठी योग्य ती नैसर्गिक खते आणि बियाणेसुद्धा त्यांना दिले जाते. म्हणजे प्रशिक्षण ,कन्सलटन्सी ,त्यानुसार लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा अशा विविध क्षेत्रात आय -खेतीचा व्याप वाढत चालला आहे अर्बन फार्मिंगच्या वर्कशॉप्सपासून सुरुवात करत आता ‘आय-खेती (i -Kheti) शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीचे धडे देण्याचे आणि त्यासाठी त्यांना आवश्यक साहित्य पुरविण्याचे काम करतेय.
“शेतकऱ्यांनासुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंगचे महत्व कळले आहे.त्यांनाही शेतीच्या आधुनिक आणि शाश्वत पद्धती वापरायच्या आहेत.परंतु त्याचे प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज आहे.म्हणूनच अर्बन फार्मिंगपुरते मर्यादित न राहता आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आय-खेती करतेय” ,असे प्रियांका शाह सांगते.
माणसाच्या विविध आरोग्यविषयक गरजा भागवताना अतिशय संवेदनशीलतेने पर्यावरणाची जोपासना करणारा बिझनेस स्थापन करणाऱ्या प्रियांकाच्या कामाचा विस्तार आता इतका वाढत चालला आहे की त्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या ‘इंटरनॅशनल व्हिझिटर्स लीडरशिप प्रोग्रॅम'(I VLP) मध्ये तिला खास आमंत्रित करण्यात आले होते .या भेटीदरम्यान एमआयटी ,हार्वर्डसारख्या अग्रणी विद्यापीठांबरोबर ,डिझाईन थिंकिंग ची पुरस्कर्ती आईडीओ( IDEO ), इनोव्हेशन मधून उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल करत जागतिक कॉर्पोरेट्स बनलेल्या गूगल ,फेसबुक ,याहू सारख्या कंपन्यांना भेट देण्याची ,त्यातून नवे काही शिकण्याची संधी तिला मिळाली. तसेच अलीकडेच टेड-एक्स टॉक (TED-x) प्रसिद्ध लेक्चर -सीरिजमध्ये शाश्वत शहरी शेतीवर आपले विचार मांडण्यासाठी प्रियांकाला खास आमंत्रण मिळाले होते.
आणि आनंदाची गोष्ट म्हणजे वेलिंगकर इन्स्टिट्यूट (WeSchool ) ने अलीकडेच स्थापन केलेल्या ‘ऍग्री -लॅब’ प्रकल्पासाठी आपल्या या माजी विद्यार्थिनीला कन्सल्टन्ट म्हणून नेमले आहे. आज देशात ‘स्टार्ट-अप इंडिया’ ,’मेक-इन इंडिया’चे वारे खेळत असताना ,ज्यांच्या घरात पूर्वी कधी उद्योग-व्यवसाय करण्याची परंपरा नव्हती असे अनेक तरुणतरुणी उद्योजकतेच्या क्षेत्रात धाडसाने उड्या घेताना दिसत आहेत,त्यातून ई -कॉमर्सचा मोठा विस्तार होताना दिसतोय पण बिझनेस करताना केवळ आर्थिक नफ्याची गणिते जमावण्याऐवजी सामाजिक आणि पर्यावर्णीय संवेदनशीलतेला केंद्रस्थानी ठेवणारा बिझनेस म्हणून प्रियांका अमर शाहच्या ‘आय-खेती’ ची उल्लेखनीय नोंद घ्यावीच लागेल.
”