Welingkar Blog: Beyond the Walls

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Home » Articles » Managing Challenges in Family Managed Business
⦿   4 Mins Read
⦿   4 Mins Read

Managing Challenges in Family Managed Business

उद्यमशीलता आणि उद्योजकतेतील नावीन्य यासाठी भारत हा जगातील एक सर्वोत्तम देश म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे या उद्योजकतेचा खरा कणा आहे तो कौटुंबिक व्यवसाय. आपल्या देशातील जवळपास 80 टक्के व्यावसायिक हे कौटुंबिक मालकी आणि व्यवस्थापन असलेले उद्योजक आहेत. त्यातूनही ते लघु आणि मध्यम उद्योगात कार्यरत असल्याने देशाच्या आर्थिक विकासातील त्यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. त्याचबरोबर खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करून सामाजिक उत्थान (सोशल अपलिफ्टमेंट) आणि समाजकल्याण साधण्यातही या कौटुंबिक व्यवसायांनी घातलेली मोलाची भरदेखील विसरता येणार नाही.

भारतीय व्यावसायिकतेच्या इतिहासात डोकावून बघितले तर टाटा, बिर्ला, बजाज, वालचंद, मोदी, थापर, डाबर अशी नावे चटकन डोळ्यासमोर येतात. जवळपास या सर्वच कुटुंबांतील पहिल्या सदस्यांनी छोट्या उद्योगाच्या रूपाने व्यवसायाचे बीज रोवले. त्यानंतर आलेल्या पिढीने या उद्योगाला उद्यमशीलता, नावीन्य, मेहनतीचे खतपाणी घालून कौटुंबिक व्यवसायाचा महाकाय वृक्ष बनवला. या महाकाय वृक्षाच्या सावलीत लाखो लोकांना रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावले. या कौटुंबिक व्यवसायांचीही दरम्यानच्या कालावधीत मोठी भरभराट झाली; पण नवीन पिढ्या जशा या व्यवसायात येऊ लागल्या तशा या व्यवसायांना विभक्तपणाचे तडेही जाऊ लागले. त्यामुळेच आता या कौटुंबिक व्यवसायाच्या अखंडतेबद्दल नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रिलायन्स बंधू, बजाजचे काका-पुतण्यांपासून ते मफतलाल बंधूंपर्यंत प्रत्येक प्रथितयश उद्योगपतीच्या कुटुंबात संघर्षाच्या ठिणग्या उडून व्यवसाय विभक्त झाल्याची उदाहरणे आपण सर्वांनी बघितली. बरं, ही परिस्थिती केवळ भारतीय व्यावसायिकांच्या बाबतीत आहे असे नाही, तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील ग्युसी, लॉरिअल, फियाट, व्हायकॉम यांसारख्या बड्या ब्रॅँड्सच्या कौटुंबिक व्यवसायांनादेखील वादविवाद, कौटुंबिक विभाजनाला तोंड द्यावे लागल्याचे दिसून येते.

शंभर कौटुंबिक व्यावसायिकांपैकी केवळ 3 ते 4 कुटुंबेच तिस-या पिढीपर्यंत तग धरू शकली आणि उर्वरित व्यवसाय एक तर बंद पडले, विभक्त झाले किंवा पहिल्या वा दुस-या पिढीकडून त्यात बदल झाल्याचे जागतिक संशोधनाअंती दिसून येते. ही कुटुंबे आपले व्यावसायिक अस्तित्व टिकवणार कसे आणि जागतिक स्पर्धात्मक वातावरणात झेप कशी घेणार, हा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची झाल्यास कौटुंबिक व्यवसायाचे वेगळेपण आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंब आणि व्यवसाय या दोन एकात्मिक दिशांमधून कौटुंबिक व्यवसायाची निर्मिती होते. आणि साधारणपणे दोन किंवा जास्त कौटुंबिक सदस्यांकडे त्याची मालकी किंवा व्यवस्थापन असते. दुस-या शब्दात सांगायचे तर कौटुंबिक व्यवसाय मालकाची मूल्ये, दूरदृष्टी, नियोजन, कामगिरी, नि:पक्षपाती संघटनात्मक धोरणे आदी गुण यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कौटुंबिक विश्वासाचा परिणाम व्यावसायिक उद्दिष्टांवर होत असतो. सार्वजनिक क्षेत्रातील, बहुराष्ट्रीय आणि सार्वजनिक मर्यादित महामंडळे यांसारख्या अन्य व्यवसायांमध्ये मालकीचे स्वरूप हे व्यवसाय व्यवस्थापनाच्या बाबतीत वेगळे असते. व्यवसायाचे उद्दिष्ट आणि नफ्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणे आणि त्यानुसार कंपनी चालवण्याची जबाबदारी या व्यावसायिक अधिका-यांवर असते. त्याच वेळी कर्मचा-यांची कामगिरी आणि गुणवत्ता याला प्रथम प्राधान्य असते; पण कौटुंबिक व्यवसायात मात्र आदर, विश्वास, कुटुंबातील सदस्यांचा त्यातला सहभाग आदी गोष्टी व्यावसायिक लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यातूनही कौटुंबिक सदस्यांमधील नातेसंबंध आणि विचारांचे आदानप्रदान यामुळे व्यावसायिक जोखीम पत्करणे, व्यवसायवृद्धीच्या संधी काबीज करणे आणि उद्यमशीलतेचा झरा अखंड खळखळत ठेवणे शक्य होऊ शकते. या सगळ्या गोष्टी ख-या असल्या तरीही सामाईक दृष्टिकोनाचा अभाव, संपर्काचा अभाव या गोष्टी कौटुंबिक व्यवसायवृद्धीच्या आड येणा-या ठरतात, तर ब-याचदा कौटुंबिक विश्वास आणि परंपरा या व्यावसायिक लक्ष्य आणि उद्दिष्टांना बाधा ठरू शकतात.

सध्या भारतीय कौटुंबिक व्यवसाय मोठ्या स्थित्यंतरातून वाटचाल करत आहे. 1990मध्ये सुरू झालेल्या आर्थिक सुधारणा भारतीय व्यवसायांसाठी, विशेषकरून कौटुंबिक व्यवसायांसाठी टर्निंग पॉइंट ठरल्या आहेत. जागतिक स्पर्धा, उत्पादकतेवर आलेला ताण, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार या सगळ्याचा कौटुंबिक व्यवसायांच्या इको सिस्टिम्सवर ताण जाणवू लागला आहे. भरभराटीला लागलेली ओहोटी आणि घटत चाललेला नफा यामुळे व्यावसायिक कुटुंबांमध्ये संघर्ष, भांडणे आणि ती विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक व्यवसायावरील माझ्या संशोधनानुसार भारतीय व्यवसायामध्ये नंतरच्या पिढ्यांपेक्षा पहिल्या पिढीतच विभक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. लघु आणि मध्यम व्यवसाय दोन किंवा तीन वारसदारांमध्ये विभागल्यामुळे या व्यवसायांचा आकार आणखीनच लहान झाला असून या बदलत्या वातावरणात तग धरण्यासाठी त्यांच्याकडे स्रोतांची उपलब्धतादेखील मर्यादित झाली आहे.

भारतातील कौटुंबिक व्यवसाय सध्या सामाजिक-सांस्कृतिक, पुढच्या पिढीचा वारसदार, कौटुंबिक प्रशासन अशा तीन आव्हानांना तोंड देत आहे. वाढते नागरीकरण, विभक्त कुटुंबपद्धतीत झालेली वाढ, प्रसारमाध्यमांचे प्राबल्य, आधुनिक जीवनशैली, जाती आणि धर्माच्या क्षीण होत चाललेल्या सीमारेषा, जवळपास संपुष्टात आलेली संयुक्त कुटुंबपद्धती याचा परिणाम कौटुंबिक व्यवसायाच्या रचनेवर मोठ्या प्रमाणावर   होत आहे. त्याच्याच जोडीला इंडिव्हिज्युअलिझम, स्त्री-पुरुषांना समान संधी, कौटुंबिक व्यवसायात महिलांचा सहभाग याचाही परिणाम या व्यवसायावर होत आहे. दुस-या बाजूला पुढच्या पिढीतील वारसदाराचा प्रश्न या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. डाबर, जीएमआर, मुरुगप्पासारख्या बड्या आणि संघटित व्यवसाय समूहांनी वारसदाराचे नियोजन अतिशय सुनियोजित पद्धतीने केले; परंतु बहुतांश खासगी कौटुंबिक व्यावसायिकांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. कौटुंबिक प्रशासन याकडेही या व्यवसायांनी लक्ष पुरवणे अतिशय गरजेचे आहे. कारण ब-याचदा अशा व्यवसायात निर्णय हे मध्यवर्ती असतात आणि ते व्यवसायापेक्षाही कुटुंब किंवा वैयक्तिक सदस्य डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. अशी स्थिती व्यवसायातील बिगर कौटुंबिक सदस्यांसाठी जास्त सतर्क करणारी असते. पाश्चिमात्य देशांमध्ये मालकी ही व्यवस्थापनाच्या नियंत्रणापासून स्वतंत्र असते. त्यामुळे कौटुंबिक आशा-आकांक्षा आणि व्यावसायिक उद्दिष्ट आणि निर्णय यामध्ये कधीही संघर्ष होण्यास वाव नसतो. त्याचप्रमाणे कौटुंबिक प्रशासन यंत्रणा अशा प्रकारे विकसित केलेली असते की, ज्यामध्ये प्रत्येकाचे हक्क, जबाबदा-या आणि व्यवसायातील कौटुंबिक सहभाग याचे नियम स्पष्ट असतात.

मालकीबरोबरच व्यवसायाचे व्यवस्थापन व्यावसायिक रीतीने करण्यास जास्त प्राधान्य असते; परंतु आपल्याकडील कौटुंबिक मालकीच्या आणि व्यवस्थापन असलेल्या व्यवसायांमध्ये जागरूकता असली तरीही व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनाचे प्रमाण कमी आहे.

Dr Mita Dixit ,Consultant – Equations Management Consulting

Dr Mita Dixit is a PhD in FMB conflicts. She is a full time consultants to FMB and is a visiting prof with WeSchool.

About the author

weschool

Voluptates aspernatur et ea unde molestiae pariatur sit. nisi laudantium voluptas sunt perspiciatis quas. Deleniti in cumque impedit. Totam repudiandae fuga aut velit.

Share this post :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Scroll to Top